मराठी माध्यमांच्या शाळांची घटती संख्या
मराठी माध्यमांच्या शाळांची घटती संख्या
मराठी शाळा बंद पडत आहेत, याला जबाबदार कोण, हे नेमके सांगता येणार नाही. याचे कारण अनेक घटक या गोष्टीला कारणीभूत आहेत. शासन आणि प्रशासन यांच्यातील हलगर्जीपणा आहेच, मात्र सोबत मराठी माणूस सुद्धा आहे. त्यामुळे नेमके अमुक अमुक दोषी, असे सांगता येणार नाही.
याच प्रश्नातील दुसरा प्रश्न म्हणजे, तंत्रज्ञान युक्त मराठी शाळा झाल्यास चालतील का? या प्रश्नाला प्रतिप्रश्न. करेन मी की, तंत्रज्ञान हे एकमेव कारण आहे का मराठी शाळांपासून विद्यार्थी दूर जात आहेत? तर नाही. भाषा हा घटक मराठी शाळेपासून विद्यार्थी दूर जात असण्याला आहे. तो कसा, तेही पाहू.
मराठी शाळा तंत्रज्ञान संपन्न, सोई सुविधा युक्त, चकचकीत झाली, तर लोक मराठी शाळेकडे वळतील का? तर नाही. याचे कारण इंग्रजी शाळेकडे असणारा ओढा हा भाषेमुळे आहे. तो कसा तर, इंग्रजी शिकल्याने पुढे अनेक संधी निर्माण होतात, मराठीतून शिकून पुढे संधी मिळत नाहीत, हे मराठी लोकांच्या डोक्यात घट्ट रुजले आहे. म्हणून मध्यमवर्गीय सोडा गरीब घरातील मुलांनाही त्यांचे पालक कसोशीने प्रयत्न करून, दिवस रात्र राबून इंग्रजी शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतात.
मला असे वाटते की, आपल्याला सर्वात आधी मराठी लोकांमध्ये हे जागृत करावे लागेल की, मराठी शिकल्याने सुद्धा पुढे नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी आहेत. अनेक थोर व्यक्तिमत्व मराठी भाषेतून शिकून पुढे गेले आहेत. अशी उदाहरणे आपल्याला त्यांना सांगावी लागतील. पटवून द्यावी लागतील. आणि हे मोठ्या प्रमाणात व्हावे लागेल. कारण लोकांच्या मनात विश्वास नाही की, मराठीतून शिकल्यावर आपल्या पाल्याला पुढे संधी मिळेल.
दुसरे म्हणजे, भाषा केवळ अस्मितेचा मुद्दा असून भागात नाही, तर तो पोटापाण्याचा मुद्दा झाला पाहिजे. मात्र आपल्याकडे केवळ अस्मिता आणि भावनेच्या बांधावरच भाषा अडकून आहे.
मराठी अभ्यास केंद्र किंवा तत्सम संस्थांसारखे सखोल आणि जमिनी काम मराठी भाषेसाठी अपेक्षित आहे. मात्र अशा संस्थांना काही मर्यादा येतात. मग आर्थिक असतील किंवा आणखी कसल्या. शासन सुद्धा पाठबळ देत नाही. मात्र या संस्थांसारखे काम झाले पाहिजे.
शेवटी तेच की, केवळ तंत्रज्ञान ही गोष्ट कारणीभूत नाही तर मराठी शाळेकडे कल वाढवण्यासाठी इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत.
मातृभाषेतून शिक्षण घेत मोठं यश मिळवण्याची अनेक उदाहरणे असतानाही मराठी शाळांमधील (Marathi School) विद्यार्थी संख्या कमी होण्याचे सत्र सुरुच आहे. शाळांचा दर्जा घसरत असल्याचे म्हणत पालक मुलांना मराठी शाळेत घालण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. अशातच गेल्या 10 वर्षात विद्यार्थी संख्येत तब्बल 51 टक्के घट झालीय. म्हणजेच पालकांनी मराठी शाळांकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे.
प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने (praja foundation) मुंबई महापालिकांच्या शाळांच्या (BMC School) स्थिती संदर्भातला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार मराठी माध्यमात गेल्या 10 वर्षात विद्यार्थी संख्येत 51 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. मात्र कोविड काळानंतर मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे कोविडनंतर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 10 वर्षात इंग्रजी माध्यमात विद्यार्थी संख्या 40 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या 10 वर्षात मराठी शाळेच्या तुलनेत इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर कोविडनंतर मराठी माध्यमात 2 टक्क्यांनी विद्यार्थी संख्या वाढली आहे. दुसरीकडे गेल्या 10 वर्षात इंग्रजीत माध्यमात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशने संवाद प्रमुख योगेश मिश्रा यांनी दिलीय.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सातत्याने प्रगती होत असल्याचेही फाउंडेशने म्हटलंय. या शाळेतील विद्यार्थी संख्येत 92 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राथमिक शिक्षणानंतर 40 टक्के विद्यार्थी हे मुंबई महापालिकेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करत आहेत.
Comments
Post a Comment